Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

सिटी सेंटर मॉलसमोरील खड्ड्याने गिळली चारचाकी; वाहनाचे मोठे नुकसान

 सिटी सेंटर मॉलसमोरील खड्ड्याने गिळली चारचाकी; वाहनाचे मोठे नुकसान


काही दिवसांपूर्वी दुचाकीस्वार गंभीर जखमी; तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष कायम


 नाशिक प्रतिनिधी ताः २२ जुलै 

सिडकोतील सिटी सेंटर मॉलसमोरील रस्त्याची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांचा फटका यावेळी एका चारचाकी वाहनचालकाला बसला. मंगळवारी (ता. २१) सायंकाळी वाहनाचा पुढील चाक मोठ्या खड्ड्यात अडकल्याने वाहनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनेमुळे शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



वाहनचालकाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या वेळी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज आला नाही. परिणामी वाहनाचे पुढील चाक थेट खड्ड्यात अडकले. वाहन बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांना धाव घ्यावी लागली. मोठ्या प्रयत्नांनंतर वाहन बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या प्रक्रियेदरम्यान वाहनाच्या डाव्या बाजूचेही नुकसान झाल्याचे चालकाने सांगितले.


विशेष म्हणजे, याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी सावतानगर येथील एका युवकाची दुचाकी मध्यरात्री मोठ्या खड्ड्यात गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्या घटनेनंतरही संबंधित विभागाने रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती न केल्याने वाहनचालक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.


सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला असून, दररोज अपघात आणि वाहनांचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे.


सिटी सेंटर मॉलसमोरील हा रस्ता शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असल्याने तातडीने डांबरीकरण करून खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत, अन्यथा आणखी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच प्रशासनाने तातडीने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणीही करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.