Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

द्वारका–मुंबई नाका मार्गावर चिखलाचे साम्राज्य; दुचाकीस्वार घसरून जखमी, नागरिकांकडून संताप व्यक्त

 द्वारका–मुंबई नाका मार्गावर चिखलाचे साम्राज्य; दुचाकीस्वार घसरून जखमी, नागरिकांकडून संताप व्यक्त

नाशिक : प्रतिनिधी :-ता २६जुलै 

शहरातील अत्यंत वर्दळीचा समजला जाणारा द्वारका सर्कल ते मुंबई नाका हा मुख्य मार्ग सध्या चिखलाच्या विळख्यात सापडला आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, गेल्या काही दिवसांत अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने बहुतांश अपघातांमध्ये किरकोळ दुखापती झाल्या असल्या तरी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


द्वारका ते मुंबई नाका हा नाशिक शहराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा आणि दिवसभर वाहनांनी गजबजलेला मार्ग आहे. या मार्गावर दररोज हजारो दुचाकी, चारचाकी, एसटी बस, शहर बस आणि मालवाहू वाहनांची वाहतूक सुरू असते. मात्र रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे वाहनांचे संतुलन बिघडत असून, विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे.



स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळा सुरू होताच या रस्त्यावर दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होते. वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून केवळ तात्पुरती उपाययोजना केली जाते. चिखल हटविणे, रस्ता स्वच्छ करणे किंवा कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


रस्त्यावरील चिखलामुळे वाहनांच्या रांगा लागत असून वाहतुकीचाही वेग मंदावला आहे. अचानक ब्रेक लावताना वाहने घसरत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


कोट्यवधी रुपयांची विकासकामे केल्याचा दावा करणाऱ्या महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तातडीने हा मार्ग स्वच्छ करून सुरक्षित करावा, तसेच भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.