Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

गंगापूर धरण समूहात ७६.८९ टक्के जलसाठा; नाशिकची साप्ताहिक पाणीकपात रद्द होण्याची शक्यता

गंगापूर धरण समूहात ७६.८९ टक्के जलसाठा; नाशिकची साप्ताहिक पाणीकपात रद्द होण्याची शक्यता

नाशिक (प्रतिनिधी) :-

 शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहातील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरण समूहात २२ जुलैअखेर ७६.८९ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेली साप्ताहिक पाणीकपात रद्द करण्याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालानुसार, गंगापूर धरणात ७९.६३ टक्के, तर गौतमी धरणात ९१.७६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी गंगापूर धरण समूहात ७१.५७ टक्के जलसाठा होता. यंदा त्यात सुमारे पाच टक्क्यांची वाढ झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याबाबतची स्थिती अधिक समाधानकारक बनली आहे.


महापालिकेचा दररोजचा सरासरी पाणीवापर ५९१.५२ एमएलडी इतका आहे. उपलब्ध जलसाठा आणि धरणक्षेत्रात सुरू असलेला पाऊस लक्षात घेता शहराला वर्षभरासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे साप्ताहिक पाणीकपात कायम ठेवण्याची गरज कमी झाल्याचे बोलले जात आहे.


मात्र, धरण समूहातील मुकणे धरणात अद्याप केवळ ३५.३६ टक्के जलसाठा असल्याने महापालिका अंतिम निर्णय घेताना आगामी पावसाचा अंदाज, धरणांतील पाण्याची आवक आणि शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याचे नियोजन विचारात घेणार आहे.


दरम्यान, साप्ताहिक पाणीकपात रद्द झाल्यास नाशिककरांना मोठा दिलासा मिळणार असून, महापालिकेच्या अधिकृत निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.