Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

सिडकोतील ‘कोयता दहशती’चा शेवट! सराईत गुन्हेगार अंबादास दांडेकर MPDA अंतर्गत स्थानबद्ध

गुन्हेगारीचा ‘रेकॉर्ड’च ठरला घातक; अंबादास दांडेकरवर MPDAची कारवाई

नाशिक :-(नितीन चव्हाण )


 नाशिक शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी अंबड पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करत सराईत गुन्हेगार अंबादास बाळू दांडेकर (वय २३, रा. इंदिरागांधी वसाहत क्र. १, लेखानगर, सिडको, नाशिक) याला महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (MPDA) अंतर्गत स्थानबद्ध केले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी १५ जून २०२६ रोजी स्थानबद्धतेचे आदेश पारित केले असून १६ जून रोजी त्याची अंमलबजावणी करण्यात आली.


नाशिक शहरात सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी गुन्हेगारांच्या रेकॉर्डचा आढावा घेत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी आणि अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांना आवश्यक सूचना दिल्या.

त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या प्रतिबंधक विभागाने आरोपीचा गुन्हेगारी इतिहास, वास्तव्य, हालचाली आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली दहशत याचा सखोल अभ्यास करून MPDA प्रस्ताव तयार केला. साक्षीदारांची पडताळणी आणि विविध गुन्ह्यांची माहिती संकलित करून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला.

अंबादास दांडेकर याच्याविरुद्ध नाशिक शहरात जबरी चोरी, वाहन चोरी, घरफोडी, खंडणी, मारहाण, शस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण करणे, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे आदी स्वरूपाचे तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांच्या तपासात आरोपीने सिडको परिसरातील व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचे, बांधकाम साहित्य व दुचाकी चोरी केल्याचे, विरोध करणाऱ्यांना मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच शिवाजी चौक आणि सिंहको भाजी मार्केट परिसरात कोयत्याच्या धाकावर वाहनांची तोडफोड करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याचेही समोर आले आहे.

आरोपीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध MPDA अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्थानबद्धतेचा आदेश मंजूर केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन कारागृहात रवाना करण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त  सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, पो.नीअविनाश नडविनकेरी आणि शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि विलास पडोळकर, दीपक निकम, सुभाष ठुबे, योगेश देसले, उल्हास गांगुर्डे, सागर जाधव, फरीद इनामदार, अनिल गाढवे, तुषार मते, समाधान शिंदे, वैभव एंखडे आणि मयूर पवार यांनी यशस्वीपणे पार पाडली.

नाशिक शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध MPDA आणि मोक्का अंतर्गत कठोर कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनीही गुन्हेगारीविषयीची माहिती निर्भीडपणे पोलिसांना देऊन कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.