सोनाली वाईन्सजवळ ‘एमडी’चा अड्डा उद्ध्वस्त; अंबड पोलिसांच्या कारवाईत तरुण जेरबंद
नाशिक :,नितिन चव्हाण
अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून शहराला बाहेर काढण्यासाठी अंबड पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत महालक्ष्मीनगर परिसरातील ड्रग्ज विक्रीचा डाव उधळून लावला. सोनाली वाईन्सजवळील गणेश स्नॅक्स या दुकानाजवळ ‘एमडी’ (मेफेड्रॉन) अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपीकडून ८ ग्रॅम मेफेड्रॉन, आयफोन मोबाईल आणि रोख ४ हजार रुपये असा एकूण १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किशोर काळे आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी अंमली पदार्थ सेवन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत यांनी गुन्हे शोध पथकाला अशा आरोपींचा शोध घेऊन ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
१४ जून २०२६ रोजी पोलीस आयुक्तांच्या नागरिकांच्या तक्रारींसाठी असलेल्या CPWA व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की, महालक्ष्मीनगर येथील सोनाली वाईन्सजवळील गणेश स्नॅक्स या दुकानात एक इसम अंमली पदार्थाची विक्री करीत आहे. या माहितीची खातरजमा करून कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांना पथकासह रवाना करण्यात आले.
पडोळकर यांच्यासोबत उल्हास गांगुर्डे, फरीद ईनामदार, अनिल गाढवे, मयुर पवार आदींचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेथे संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. त्याने आपले नाव विक्की संतोष वाकळे (वय २३, रा. हनुमान मंदिराजवळ, बालाजी किराणा मागे, कामठवाडे गाव, अंबड, नाशिक) असे सांगितले. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने ही माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी यांना देण्यात आली. त्यानंतर दोन पंचांच्या उपस्थितीत विक्की वाकळे याची अंगझडती घेण्यात आली.
या झडतीत आरोपीकडून झिपलॉक प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेला पांढऱ्या रंगाचा स्फटिकासारखा ‘एमडी’ (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ मिळून आला. तसेच त्याच्याकडून आयफोन मोबाईल आणि रोख ४ हजार रुपये जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे वजन ८ ग्रॅम असून, या कारवाईत एकूण १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अंबड पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेतील महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. शहरातील तरुणाईला विळखा घालणाऱ्या मेफेड्रॉनसारख्या घातक अमली पदार्थांच्या साखळीवर पोलिसांनी थेट प्रहार केल्याने या कारवाईची शहरात चर्चा सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी आणि पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, योगेश देसले, सुभाष ठुबे, सागर जाधव, समाधान शिंदे, फरीद ईनामदार, मयुर पवार, उल्हास गांगुर्डे, अनिल गाढवे, तुषार मते, वैभव एखंडे, सचिन करंजे आणि योगेश सिरसाठ यांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर करीत आहेत.
