अंबड पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक
नाशिक :, नितिन चव्हाण
शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टवाळखोर इसमांवर तसेच उघड्यावर दारू पिऊन कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांवर अंबड पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत अंबड पोलीस ठाणे हद्दीत तब्बल ९० टवाळखोर इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मपोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील संभाव्य गुन्हे रोखण्यासाठी आणि टवाळखोरांवर आळा घालण्यासाठी २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत अंबड पोलीस ठाणे हद्दीत विशेष ऑल आऊट, कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग डॉ. सचिन बारी, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करून ही कारवाई हाती घेण्यात आली.
या मोहिमेदरम्यान पवननगर, उत्तमनगर, लेखानगर, कामटवाडा आणि अंबड गाव परिसरात जोरदार तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत ९० टवाळखोर इसमांना ताब्यात घेण्यात आले, तर ३ नॉन-बेलेबल वॉरंट, २ बेलेबल वॉरंट आणि ६ समन्सची बजावणी करण्यात आली. तसेच पोलीस ठाणे हद्दीतील १० तडीपार आणि १२ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६ आरोपींच्या घरझडत्या घेण्यात आल्या, तर २२ स्टॉप अँड सर्च कारवाया करण्यात आल्या.
या विशेष मोहिमेत इंदिरानगर पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, अंबड गुन्हेशाखा आणि गुन्हेशाखा युनिट-२ मधील अधिकारी व अंमलदारांचा सहभाग होता. एकूण ६ अधिकारी आणि ३३ अंमलदारांनी या कारवाईत भाग घेतला. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अंबड परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर चांगलाच धाक बसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत तसेच पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-२ मधील गुन्हेशोध पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.
