अंबड पोलिसांची झपाट्याने कारवाई; अवघ्या पाच तासांत दोन महिला चोरट्या जेरबंद, चोरीची मूर्ती हस्तगत
सिडको:, नितिन चव्हाण
सिडको परिसरातील शिवपुरी चौक येथील शनी मंदिरातून २१ किलो वजनाची पंचधातूची शनीदेवाची मूर्ती चोरून नेल्याची धक्कादायक घटना काल दुपारच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे परिसरातील भाविक व स्थानिक नागरिकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून मंदिरातील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. मात्र या प्रकरणाचे गांभीर्य ओळखत अंबड पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेत अवघ्या पाच तासांत चोरीचा उलगडा करून दोन महिला चोरट्यांना ताब्यात घेत चोरीला गेलेली शनीदेवाची मूर्ती हस्तगत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारच्या सुमारास दोन महिलांनी शिवपुरी चौकातील शनी मंदिरात प्रवेश करून संधी साधत मंदिरातील २१ किलो वजनाची पंचधातूची शनीदेवाची मूर्ती चोरून नेली. घटनेची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. मंदिरातून देवाची मूर्तीच चोरीला गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्थानिकांनी तातडीने अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याच्या महिला एपीआय पलांडे आणि पोलीस कर्मचारी सचिन करंजे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंदिरातील मूर्ती चोरी करणाऱ्या दोन महिला शुभम पार्क परिसरात फिरत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. सचिन करंजे, सागर जाधव आणि उल्हास गांगुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित महिलांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दोन्ही महिलांची कसून चौकशी केली असता त्यांनी शनी मंदिरातील पंचधातूची मूर्ती चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेली २१ किलो वजनाची शनीदेवाची मूर्ती हस्तगत केली. धार्मिक स्थळातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणत अवघ्या काही तासांत मूर्ती परत मिळवून देण्यात अंबड पोलिसांना यश आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला एपीआय पलांडे, सचिन करंजे, सागर जाधव आणि उल्हास गांगुर्डे यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे धार्मिक भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाचा झटपट उलगडा झाला असून अंबड पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्थानिक नागरिकांनीही पोलिसांचे आभार मानत अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
