बॉडीगार्ड जिमच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणासह जिद्दीचा विजय; तिघांची देशसेवा आणि पोलीस दलात दमदार भरारी!
नवीन नाशिक नितिन चव्हाण :,
आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावर तसेच नियमित शारीरिक तयारीच्या जोरावर सिडको परिसरातील तीन युवकांनी उल्लेखनीय यश संपादन करत परिसराचा नावलौकिक वाढविला आहे. बाळासाहेब ठाकरे अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांची तयारी आणि बॉडीगार्ड जिममध्ये शारीरिक प्रशिक्षण घेणाऱ्या नचिकेत संजय घरटे, कमलेश दिलीप जगताप व आर्यन मनोज पवार यांनी अनुक्रमे इंडियन आर्मीच्या अग्निवीर आणि ठाणे शहर पोलीस दलात स्थान मिळविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल नगरसेवक राजेंद्र महाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सावतानगर येथील बाळासाहेब ठाकरे अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे आणि बॉडीगार्ड जिममध्ये नियमित शारीरिक प्रशिक्षण घेणारे हे तिन्ही युवक अत्यंत सामान्य कुटुंबातील आहेत. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही त्यांनी ध्येयाप्रती निष्ठा कायम ठेवत कठोर परिश्रमांच्या जोरावर यशाला गवसणी घातली.
नचिकेत संजय घरटे (वय २०) यांची इंडियन आर्मीच्या अग्निवीर पदासाठी निवड झाली असून ते जून महिन्यात नागपूर येथे प्रशिक्षणासाठी रवाना होत आहेत. त्यांचे वडील अंबड येथील एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत.
कमलेश दिलीप जगताप (वय २०) यांचीही इंडियन आर्मीच्या अग्निवीर पदासाठी निवड झाली असून त्यांचे प्रशिक्षण नाशिक येथील आर्टिलरी सेंटरमध्ये होणार आहे. भाजीपाला व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांच्या कष्टाला यशाची जोड देत कमलेश यांनी सैन्यदलात स्थान मिळविले आहे.
आर्यन मनोज पवार (वय २०) यांची ठाणे शहर पोलीस दलात निवड झाली असून त्यांचे प्रशिक्षण सोलापूर येथे सुरू आहे. खाजगी नोकरी करणाऱ्या वडिलांच्या पाठबळावर आर्यन यांनी स्पर्धा परीक्षा व शारीरिक चाचण्यांमध्ये यश मिळवत पोलीस सेवेचे स्वप्न साकार केले आहे.
विशेष म्हणजे, या तिन्ही युवकांनी अभ्यासासोबतच बॉडीगार्ड जिममध्ये नियमित सराव करत सैन्य व पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता विकसित केली. स्पर्धा परीक्षा आणि शारीरिक चाचणी यांचा समन्वय साधत त्यांनी यशाचा मार्ग गाठला. त्यामुळे त्यांच्या यशामध्ये अभ्यासासह शिस्तबद्ध शारीरिक प्रशिक्षणाचाही महत्त्वाचा वाटा असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
यावेळी नगरसेवक राजेंद्र महाले यांनी तिन्ही युवकांचे अभिनंदन करत, "परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करता येते, हे या युवकांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यांचे यश संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद असून इतर युवकांसाठी प्रेरणादायी आहे," असे सांगितले.
सत्कार समारंभाप्रसंगी बॉडीगार्ड जिमचे संचालक जितू बनकर, सामाजिक कार्यकर्ते विशाल पगार, धनंजय खांडे, गौरव केदार, सागर चौधरी, प्रवीण जाधव, आकाश बंदावने, अमय ठाकूर यांच्यासह परिसरातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या तिन्ही युवकांच्या यशामुळे सिडको परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
