Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

NEET पेपरफुटीचे धागेदोरे नाशिकपर्यंत; पहिली प्रश्नपत्रिका शहरातूनच बाहेर पडल्याचा धक्कादायक दावा देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ; नांदगावच्या वैद्यकीय विद्यार्थ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

 NEET पेपरफुटीचे धागेदोरे नाशिकपर्यंत; पहिली प्रश्नपत्रिका शहरातूनच बाहेर पडल्याचा धक्कादायक दावा

देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ; नांदगावच्या वैद्यकीय विद्यार्थ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात


नाशिक नितिन चव्हाण :-

देशभरातील तब्बल 22 लाख 39 हजार विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाणारी NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे मोठ्या वादात सापडली असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट नाशिकपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेची पहिली कॉपी नाशिकमधून बाहेर पडल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचा रहिवासी असलेल्या 30 वर्षीय शुभम खैरनार या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो BAMSच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राजस्थान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक गुन्हे शाखा युनिट-2 ने ही कारवाई केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, नाशिकमधून बाहेर पडलेली प्रश्नपत्रिका प्रथम हरियाणात पोहोचवण्यात आली. तेथे या पेपरचे तब्बल 10 सेट तयार करण्यात आले. त्यानंतर हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि इतर राज्यांमध्ये ही प्रश्नपत्रिका पोहोचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटचा विस्तार देशव्यापी असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, NTA अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यंदाची NEET परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून, नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित शुभम खैरनारचा शोध घेण्यासाठी तांत्रिक माहितीच्या आधारे विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांना त्याचे नाव मिळाले होते, मात्र त्याचा अचूक पत्ता आणि हालचालींबाबत माहिती नव्हती. पोलिसांचा शोध सुरू असताना शुभमने आपला लूक बदलण्यासाठी केस पूर्णपणे काढून टाकले होते तसेच कपडेही बदलले होते.

तो देवदर्शनासाठी जात असताना पोलिसांनी रस्त्यात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिस अंमलदारांनी त्याला ओळखल्यानंतर चौकशी केली असता त्याची ओळख निश्चित झाली आणि अवघ्या एका तासात त्याला ताब्यात घेण्यात आले.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या CBI कडून सुरू असून, देशभरातून आतापर्यंत 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिक पोलिसांकडून राजस्थान पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.