आडगाव नाक्यावर पहाटेचा रक्तरंजित थरार
वाद मिटवायला गेलेल्या तरुणाचा चाकूने भोसकून खून; संशयित राजाचा पोलीसांकडून शोध सुरू
नाशिक प्रतिनिधी :-
नाशिकच्या आडगाव नाका परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याने परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे. मित्रांमधील वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या जयंत पवार या तरुणाची धारदार चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आडगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत संशयित राजा काकिपुरे याचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत जयंत पवार हे त्यांचा मित्र ‘वस्ताद’ याच्यासोबत आडगाव नाका परिसरात आले होते. त्यावेळी संशयित राजा काकिपुरे हा परिसरात बसून बियर पित होता. दरम्यान, किरकोळ कारणावरून वस्ताद आणि राजा यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. सुरुवातीला सामान्य भांडण वाटणारा हा वाद काही क्षणातच उग्र झाला.
दोघांमध्ये सुरू असलेला वाद वाढत असल्याचे पाहून जयंत पवार यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी संशयित राजाने जयंत यांना अश्लील शिवीगाळ सुरू केली. त्यावर जयंत यांनीही प्रत्युत्तर दिल्याने संतापलेल्या राजाचा संताप अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने जवळील धारदार चाकू काढून जयंत यांच्या पोटात सपासप वार केले.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी झालेल्या जयंत पवार हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. उपस्थितांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयित राजा काकिपुरे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हत्या केल्यानंतर संशयित घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पहाटेच्या वेळी घडलेल्या या थरारक हत्येमुळे आडगाव नाका परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
