निदा खान प्रकरणाला नवे वळण; नगरसेवकाचा कथित व्हिडिओ व्हायरल
सिडको प्रतिनिधी :-
टिसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण व धर्मांतर प्रकरणात फरार असलेल्या निदा खानला अटक झाल्यानंतर आता तिला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचा कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. व्हिडिओची सत्यता अद्याप समोर आलेली नसली तरी या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नामांकित टिसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण तसेच धर्मांतर प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणातील संशयित व फरार असलेल्या निदा खानला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नरेगाव परिसरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली.
याच पार्श्वभूमीवर आता मतीन पटेल यांचा कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, शहरात खळबळ उडाली आहे. संबंधित व्हिडिओबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असून, राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या पडताळण्यात आलेली नाही. पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संबंधित व्हिडिओ नेमका कधीचा आहे, तो खरा आहे की छेडछाड करून तयार करण्यात आला आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या प्रकरणात पोलिसांची पुढील भूमिका काय असणार, व्हिडिओतील महिलेची ओळख पटवून तिच्याकडून सत्यता जाणून घेतली जाणार का, तसेच सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई होणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संवेदनशील स्वरूपाच्या या प्रकरणामुळे पोलिस प्रशासनाकडून अत्यंत सावधगिरीने तपास केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
