Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

नाशिक हादरलं : सराफ दुकानावर दरोड्याचा थरार, मालकावर गोळीबार

 नाशिक हादरलं : सराफ दुकानावर दरोड्याचा थरार, मालकावर गोळीबार


हिरावाडीत रात्रीची खळबळ : समृद्धी ज्वेलर्सवर हल्ला करून दरोडेखोर फरार

नाशिक (प्रतिनिधी):-

पंचवटी परिसरातील हिरावाडी येथे गुरुवारी रात्री घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. हिरावाडीतील समृद्धी ज्वेलर्स या सराफ दुकानावर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वेळी दुकान मालकावर गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास काही संशयित अचानक समृद्धी ज्वेलर्स दुकानात घुसले. त्यांनी दुकानातील दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुकान मालकाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच दरोडेखोरांनी थेट गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गोळीबाराचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

घटनेनंतर संशयितांनी तेथून पलायन केल्याचे सांगितले जात आहे. गोळीबारात दुकान मालक जखमी झाले का, तसेच दुकानातून काही ऐवज लंपास करण्यात आला का याबाबत उशिरापर्यंत अधिकृत माहिती समोर आली नव्हती.

घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करत तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संशयितांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, सराफ दुकानावर थेट गोळीबार करत दरोड्याचा प्रयत्न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचवटी परिसरातील व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे.

या घटनेमुळे नाशिक शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.