तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा घरफोड्या अखेर जाळ्यात
गुन्हेशाखा युनिट-२ ची धडाकेबाज कारवाई; भगूरमधून रेकॉर्डवरील आरोपी ताब्यात
नाशिक नितिन चव्हाण :-
नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-२ ने घरफोडीच्या गुन्ह्यातील तब्बल तीन वर्षांपासून फरार असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. अफजल हुसेन सैय्यद (वय २९, रा. बलकवडे चाळ, भगूर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
रेकॉर्डवरील तसेच फरार आरोपींचा शोध घेण्याच्या मोहिमेदरम्यान गुन्हेशाखा युनिट-२ चे अधिकारी व कर्मचारी आरोपींचा माग काढत होते. त्यावेळी घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अफजल सैय्यद हा भगूर येथे आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
ही माहिती मिळताच प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, महेश खांडबहाले, तेजस मते, प्रविण वानखेडे आणि जितेंद्र वजीरे यांच्या पथकाने भगूर येथील बलकवडे चाळ परिसरात सापळा रचला.
पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने घरफोडीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी आरोपीला उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई गुन्हेशाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. समाधान हिरे, संजय सानप, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, महेश खांडबहाले, तेजस मते, प्रविण वानखेडे आणि जितेंद्र वजीरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
