खाद्यपदार्थ स्टॉल्स हटवले; दोन ट्रक साहित्य जप्त, नागरिकांकडून कायमस्वरूपी कारवाईची मागणी
नाशिक नितिन चव्हाण :
गोविंदनगर ते आरडी सर्कलमार्गे सिटी सेंटर मॉलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने धडक कारवाई करत अनधिकृत खाद्यपदार्थ स्टॉल्स, हातगाड्या आणि पथविक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले. या कारवाईत तब्बल दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आल्याने अतिक्रमणधारकांची एकच धावपळ उडाली. अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या या मार्गाला अखेर मोकळा श्वास मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
गोविंदनगर–आरडी सर्कल–सिटी सेंटर मॉल हा मार्ग शहरातील अत्यंत वर्दळीचा समजला जातो. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि नागरिकांची सततची ये-जा असते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हातगाड्या आणि विविध पथविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली होती. रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत होती. तसेच छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनाही वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत होती.
महापालिकेकडून यापूर्वीही काहीवेळा कारवाई करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच अतिक्रमणधारक पुन्हा त्याच जागेवर व्यवसाय थाटत असल्याने परिस्थिती जैसे थे राहत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर सभापती बाळकृष्ण शिरसाठ यांनी संबंधित विभागाला कठोर कारवाईचे आदेश दिले होते.
त्यानुसार सोमवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोठ्या फौजफाट्यासह मोहीम राबवत रस्त्यालगत उभारण्यात आलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, खुर्च्या, टेबल, हातगाड्या आणि इतर साहित्य हटवले. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले असून ते दोन ट्रकमध्ये भरून नेण्यात आले.
उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या आदेशानुसार सिडको विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. कारवाईदरम्यान काही अतिक्रमणधारकांनी साहित्य वाचवण्यासाठी धावपळ केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, या कारवाईमुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली असली तरी महापालिकेने ही मोहीम सातत्याने सुरू ठेवून हा मार्ग कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त ठेवावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
