बंजोज कॅफेला आग लागल्याने उडाली खळबळ; ग्राहकांची जीव वाचवण्यासाठी धावपळ
सिडको नितिन चव्हाण :-
नाशिक शहरातील उत्तमनगर चौक परिसर रविवारी रात्री अचानक लागलेल्या आगीमुळे हादरून गेला. येथील बंजोज कॅफेमध्ये सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. आग लागली त्यावेळी कॅफेमध्ये अनेक ग्राहक उपस्थित होते. अचानक धूर आणि आगीचे लोळ उठू लागल्याने ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्रसंगावधान राखत सर्वांनी वेळेत बाहेर धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली.
आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. कॅफेमधील फ्रिज, गॅस सिलेंडर, फ्रायर ओव्हन, टेबल-खुर्च्या, फॅन तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले. आगीचे लोळ आणि धुराचे लोट तब्बल तासभर परिसरात दिसत होते. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली होती.
विशेष म्हणजे, कॅफेच्या वरच्या मजल्यावर निवासी फ्लॅट असल्याने तेथील रहिवाशांमध्ये घबराट पसरली. संभाव्य धोका लक्षात घेत रहिवाशांनी तत्काळ घराबाहेर पडत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे केंद्र प्रमुख हर्षद पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली बीडिंग फायरमन मुकुंद सोनवणे, के. के. पवार, सुनील घुगे, इस्माईल काजी, पंकज शिंदीकर आणि अन्य जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग आसपासच्या इमारतींमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
