नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी १८ जूनला मतदान
नाशिक (प्रतिनिधी ) नितिन चव्हाण
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता संपूर्ण नाशिक जिल्ह्यात लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात नऊ मतदान केंद्रे असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात काल दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा
निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यात आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
उल्लंघन होणार नाही, याची सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांनी दक्षता घ्यावी. महाराष्ट्र विधान परिषद, नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ करीता सोमवारी (दि.२५) अधिसूचना जारी केली जाणार आहे. सोमवारी (दि.१ जून) नामनिर्देशन भरण्याचा अंतिम दिवस आहे. मंगळवारी (दि.२) नामनिर्देशन पत्राची
छाननी केली जाईल. गुरुवारी (दि.४) उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस असून गुरुवारी (दि.१८) सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. तर सोमवारी (दि.२२) मतमोजणी सय्यद पिंपरी येथील धान्य गोदामात केली जाणार आहे. त्यानंतर दि. २५ जून रोजी आचारसंहिता संपुष्टात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
विधान परिषद, स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी
आयुष प्रसाद (२०५३-२५७८५००) तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत (०२५३-२५७८५०१) काम बघणार आहेत.
दरम्यान, नामनिर्देशन पत्रे जिल्हाधिका-यांच्या दालनात पहिला मजला येथे सकाळी १२ ते दुपारी ३ या कालावधीत स्वीकारण्यात येतील.
विधान परिषद, नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही विधानसभा मतदारसंघात
नाव असणे बंधनकारक आहे व त्यांची साक्षांकित प्रती नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे आवश्यक आहे.
या व्दैवार्षिक निवडणुकीकरिता जिल्हा परिषद नाशिक सदस्य, महानगरपालिका सदस्य, नाशिक आणि मालेगाव, तसेच जिल्ह्यातील कॅन्टोमेंट बोर्ड, देवळाली, मनमाड, येवला, नांदगाव, सटाणा, सिन्नर, इगतपुरी, भगूर, त्र्यंबकेश्वर, चांदवड, ओझर, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, कळवण, निफाड, देवळा, पेठ, सुरगाणा येथील स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य असे ६२२ सदस्य यावेळी मतदान करणार आहेत.
