Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

नवीन नाशिकात श्री रेणुका देवी मंदिराचा ९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न पालखी मिरवणूक, ५६ भोग, महाआरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भाविकांची मनं जिंकली

नवीन नाशिकात श्री रेणुका देवी मंदिराचा ९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

पालखी मिरवणूक, ५६ भोग, महाआरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भाविकांची मनं जिंकली


सिडको :-नितिन चव्हाण 

 नवीन नाशिक परिसरातील शुभम पार्क कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री रेणुका देवी (माहूरगड) मंदिराचा ९ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. शुक्रवार दि. ८ मे २०२६ पासून सुरू झालेला हा तीन दिवसीय धार्मिक सोहळा रविवार दि. १० मे रोजी विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य पालखी मिरवणुकीने संपन्न झाला.


शुभम पार्क कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ तसेच रेणुका माता महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाला परिसरातील नागरिक आणि भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वैशाख कृष्ण या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या या वर्धापन दिन सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ८ मे रोजी सकाळी देवी पूजन आणि सप्तशती पाठाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वेदमंत्रांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या धार्मिक विधींमुळे मंदिर परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.


दुसऱ्या दिवशी ९ मे रोजी महिलांसाठी कुमकुम अर्चन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत देवीची आराधना केली. सायंकाळी महिला भजनी मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या भक्तिगीतांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. ढोल, टाळ, मृदंगाच्या साथीने सादर झालेल्या भजनांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते.

उत्सवाच्या अंतिम दिवशी १० मे रोजी होम-हवन आणि श्री रेणुका देवी मातेला ५६ भोग अर्पण करण्याचा विशेष कार्यक्रम पार पडला. यानंतर सायंकाळी श्री रेणुका देवीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

मिरवणुकीत लेझीम पथक, शंखवादन तसेच सप्तशृंगी देवी, कालिका देवी आणि गोंधळी यांची वेशभूषा केलेल्या महिला भक्तगण विशेष आकर्षण ठरल्या. महिलांनी सादर केलेल्या पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिभावाने सजलेल्या पालखीमुळे मिरवणुकीला धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव लाभले.

सायंकाळी महाआरतीनंतर बक्षीस वितरण समारंभ, लकी ड्रॉ तसेच करा ओके क्लबच्या वतीने संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली होती.

या तीन दिवसीय धार्मिक उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभम पार्क कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ, रेणुका माता महिला मंडळ तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमादरम्यान आयोजकांच्या वतीने सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घ्यावे आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.