१५ दिवस सभापती ‘बेघर’; अखेर सिडको कार्यालयाला लागला मुहूर्त!
भोंगळ प्रशासनाला शिरसाठांचा दणका बसणार का? सिडकोवासीयांच्या नजरा नव्या सभापतींकडे
नाशिक :-नितीन चव्हाण
नाशिकच्या नवीन सिडको विभागीय कार्यालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, विभाग सभापतींची निवड होऊन तब्बल पंधरा दिवस उलटल्यानंतरही सभापतींना अधिकृत कार्यालय उपलब्ध करून देता आले नव्हते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
सभापती पदावर निवड झाल्यानंतर नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि विकासकामांसाठी लोकप्रतिनिधींना स्वतंत्र कार्यालय आवश्यक असते. मात्र सिडको विभागीय कार्यालयातच सभापतींना बसण्यासाठी अधिकृत केबिन नसल्याने “जनतेने आपले प्रश्न मांडायचे तरी कुठे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात होता.
दरम्यान, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सभापती कार्यालयाच्या पदग्रहण सोहळ्याला मुहूर्त लागला आहे. सभापती बाळकृष्ण चंद्रभान शिरसाट हे आज सत्यनारायण पूजन करून अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत. कार्यालयातील रंगरंगोटी आणि सजावटीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून परिसरात सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे.
एकीकडे पदग्रहण सोहळ्याचा थाटमाट पाहायला मिळत असला तरी दुसरीकडे सिडको विभागीय कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सभापतींनाच वेळेत कार्यालय उपलब्ध करून देता न आलेल्या प्रशासनाला आता नव्या सभापतींकडून कशी शिस्त लागणार, याकडे सिडकोवासियांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक प्रशासनातील दिरंगाई, नियोजनाचा अभाव आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष या मुद्द्यांवर आता सभापती शिरसाट कोणती भूमिका घेतात, हे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे. सिडको विभागातील रखडलेले प्रश्न, नागरी सुविधा आणि प्रशासनातील शिस्त यावर नव्या सभापतींची खरी कसोटी लागणार असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
