पाथर्डी–दाढेगाव पुलावर पुन्हा जीवघेणी घटना; ४० वर्षांपासूनचा प्रश्न ऐरणीवर
नाशिक (प्रतिनिधी) :-ता ३१जुलै
पाथर्डी–दाढेगाव रस्त्यावरील पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पाणी आल्याने पुलावरून दुचाकीने जात असताना एक व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना शनिवारी घडली. सुदैवाने संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले आहेत.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या 35 ते 40 वर्षांपासून या पुलाचा प्रश्न प्रलंबित असून, यापूर्वीही अनेक शेतकरी, जनावरे तसेच नागरिक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. वारंवार अपघात होऊनही प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही.
पावसाळ्यात हा पूल पूर्णपणे धोकादायक ठरत असून, परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने उंच, मजबूत आणि सुरक्षित पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत पंढरी मभोर, संदीप भोर, शिवाजी भोर, अंकुश भोर, समाधान जाधव, भाऊसाहेब जाधव, कारभारी जाधव, नंदू सोनवणे, कांतीलाल भोर, प्रवीण भोर, आदिनाथ जाधव, निवृत्ती भोर आदी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या पुलाच्या प्रश्नाकडे प्रशासनाने यापुढे दुर्लक्ष करू नये, अशीही भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
