शहरातील जलसंकट, रस्त्यांची दुरवस्था, नालेसफाईतील हलगर्जीपणा आणि अपूर्ण विकासकामांवर तातडीने चर्चा करण्याची मागणी
नाशिक (प्रतिनिधी ):-
नाशिक शहरात ७ व ८ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण शहरात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेची तातडीने विशेष महासभा बोलविण्याची मागणी प्रभाग क्रमांक २४ चे नगरसेवक प्रविण ( बंटी )तिदमे यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अतिवृष्टीदरम्यान शहरातील विविध भाग जलमय झाल्याने, अपूर्ण विकासकामांमुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने आणि नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे व ड्रेनेजचे पाणी शिरल्याने प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, मनपा मुख्यालयासमोरील अवघ्या सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झालेल्या काँक्रीट रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी साचल्याने त्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील सिडको, सातपूर, पंचवटी, मध्य नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड, सीबीएस, जेलरोड, म्हसरूळ, त्र्यंबकेश्वर रोड आणि एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या अपूर्ण विकासकामांमुळे अनेक रस्ते जलमय झाले. खोदकामे, खड्डे आणि अडथळ्यांमुळे वाहतूक ठप्प झाली, तर अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे प्रभावीपणे न झाल्याने आणि विविध विभागांच्या खोदकामांनंतर रस्ते पूर्ववत न केल्यामुळे अनेक भागांत पावसाचे पाणी व दूषित ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणात संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आगामी पावसाळ्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी सिंहस्थ विकासकामे, नालेसफाई, पाणी निचरा व्यवस्था आणि अपूर्ण विकासकामांचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी तातडीने विशेष महासभा बोलावून ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
