Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

तोरणा नगरात खड्ड्यांचे साम्राज्य! प्रशासन झोपेत; अपघात टाळण्यासाठी नागरिकांनीच खड्ड्यात रोवला लाल इशाऱ्याचा झेंडा

तोरणा नगरात खड्ड्यांचे साम्राज्य! प्रशासन झोपेत; अपघात टाळण्यासाठी नागरिकांनीच खड्ड्यात रोवला लाल इशाऱ्याचा झेंडा


नाशिक :- नितीन चव्हाण

 नाशिकच्या सिडको परिसरातील तोरणा नगरात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दररोज अपघाताचा धोका निर्माण होत असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संतप्त नागरिकांनी आता अनोखे आंदोलन सुरू केले आहे. अपघात होऊ नयेत म्हणून नागरिकांनी चक्क खड्ड्यात काठी रोवून त्यावर लाल रंगाचा कपडा बांधत वाहनचालकांना इशारा दिला आहे.



सिडकोतील तोरणा नगर परिसरातील रस्त्यावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी चालक तसेच पादचारी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.


विशेषतः रात्रीच्या वेळी हे खड्डे न दिसल्याने अपघात होण्याचा धोका अधिक वाढला आहे. अनेक वाहनचालक किरकोळ अपघातांचे बळी ठरले असून, एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.


प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र त्याची दखल न घेतल्याने अखेर नागरिकांनी स्वतःच खड्ड्यात काठी रोवून त्यावर लाल कपडा बांधला. हा लाल कपडा म्हणजे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर उभारलेला प्रश्नचिन्ह असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


"खड्डे बुजवण्याऐवजी नागरिकांनाच इशारे लावावे लागत असतील, तर ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे," अशी तीव्र प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली. एखादा निष्पाप नागरिक अपघाताचा बळी पडण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.


"तोरणा नगरातील हे दृश्य प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे. अपघात टाळण्यासाठी नागरिकांनाच खड्ड्यात लाल इशाऱ्याचा झेंडा रोवण्याची वेळ आली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार, की त्यापूर्वीच हे जीवघेणे खड्डे बुजवले जाणार? हा प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.