नाशिक हादरलं! 2 महिन्यांपूर्वी सुरु केलेला संसार अर्धावर मोडला, अंत्यविधीसाठी जात असताना दाम्पत्याचा अपघातात मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी) :-
कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्याजवळ सकाळी झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पत्नीची बहिण गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
खामखेडा येथून पिळकोसच्या दिशेने जाणाऱ्या एमएच 15 ईपी 3031 क्रमांकाच्या मॅक्झिमो वाहनाची एमएच 39 पी 2449 क्रमांकाच्या दुचाकीशी जोरदार धडक झाली. दुचाकीवर दिनेश करणसिंग गावित, पत्नी कीर्ती गावित आणि त्रिशा गावित हे प्रतापपूर (ता. नवापूर) येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात होते. अपघातात तिघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम कळवण उपजिल्हा रुग्णालयात, त्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दिनेश व कीर्ती गावित यांचा मृत्यू झाला, तर त्रिशा गावित यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मृत कीर्ती गावित या अभोणा येथील जनता विद्यालयात शिक्षिका, तर दिनेश गावित हे जलसंपदा विभागात कर्मचारी होते. अवघ्या मे महिन्यात विवाहबद्ध झालेल्या या दाम्पत्याचा संसार सुरू होण्यापूर्वीच अंत झाल्याने कुटुंबीयांसह शिक्षक, विद्यार्थी आणि परिसरावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास गवळी व पोलीस शिपाई नितीन वाघमारे करीत आहेत.
