जुन्या वादातून कोयत्याचा रक्तरंजित हल्ला; नाशिकरोडमध्ये तरुण गंभीर जखमी
नाशिकरोड |प्रतिनिधी
नाशिकरोड येथील सावता माळी स्वीट सत्कार पॉईंटजवळ रविवारी (१९ जुलै) रात्री जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संदीप चटोले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप चटोले हा भेळ घेण्यासाठी आला असताना दीपक उर्फ नान्या गांगुर्डे, वैभव डोळस व त्यांच्या साथीदारांनी त्याला अडवले. जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि कोयत्याने डोक्यावर, बरगडीवर तसेच पायावर सपासप वार केले. या हल्ल्यात संदीप गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी जखमी संदीपचा भाऊ दीपक सतपाल चटोले (रा. रोकडोबा वाडी, देवळाली गाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात दीपक उर्फ नान्या गांगुर्डे, वैभव डोळस व त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.
